चांगुलपणाची रुजवण

मिहीर कॉलेज संपल्यावर बाईकवरून घरी निघाला होता. ट्रॅफिक बराच असल्याने त्याचा वेग अगदी कमी होता. वाटेत बाजूच्या एका दुकानातून एक वयस्कर आजी बरंच सामान घेऊन बाहेर पडताना त्याला दिसल्या. दुकानाच्या पायऱ्या उतरतानाच समोर आलेली रिक्षा त्यांनी हाक मारून थांबवली. पण जड सामान घेऊन पायऱ्या उतरताना त्यांची तारांबळ होत होती. हे पाहिलं आणि त्या क्षणी मिहीरने बाईक बाजूला घेऊन स्टॅण्डवर लावली. पटकन पायऱ्या चढून तो वर गेला. “आजी, मी रिक्षात बसवतो तुम्हाला; पिशव्या द्या माझ्या हातात.” असं म्हणून त्याने आजींच्या हातातल्या पिशव्या घेतल्या आणि त्यांना हात देऊन रिक्षाशी आणलं. आधी त्यांना रिक्षात बसवून मग त्यांच्या हातात त्याने सगळ्या पिशव्या दिल्या. आजी रिक्षात स्थिरावल्या तेव्हा त्यांनी मिहीरचा हात हातात घेऊन प्रेमाने दाबला आणि त्याच्याकडे बघून छान हसल्या. मिहीरही हसला. रिक्षा पुढे गेली आणि पाठमोऱ्या रिक्षाकडे बघत मिहीरने आपल्या बाईकला किक मारली.
मिहीरची ही कृती म्हणजे नेमकं काय होतं? आजी ओळखीच्या नसल्याने हा काही देवघेवीचा व्यवहार नव्हता. हा परोपकार नव्हता किंवा समाजसेवाही नव्हती ही. हा होता निखळ चांगुलपणा. अगदी उत्स्फूर्तपणे आणि कुठल्याही अपेक्षेखेरीज, एखाद्यासाठी सहज काही करावंसं वाटणं म्हणजे चांगुलपणा.
गरज असेल तेव्हा एखाद्याचं बोलणं लक्ष देऊन ऐकणं, काहीही न बोलता एखाद्याची चूक पदरात घालणं, समोरच्या माणसाची मनस्थिती ओळखून त्याच्या पाठीवर हात ठेवणं – इतक्या साध्या गोष्टीतून चांगुलपणा प्रतीत होतो.
अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. पण जगण्यासाठी, त्यातल्या आनंदासाठी आणखीही काही गोष्टी आवश्यक असतात. सुधृढ नातेसंबंध, त्यातून मिळणारी ऊब, गाढ श्रद्धा, त्यातून मिळणारी शांती, मूल्यांवरचा विश्वास आणि त्यातून निर्माण होणारी चांगुलपणाची साखळी या सगळ्या गोष्टी माणसाचं जगणं समृद्ध करतात.
चांगुलपणा काही वेळा उपजत असतो पण मुख्यतः तो संस्कारातून रुजत जातो, हे संस्कार घरातल्या वातावरणाचे असतात, अवतीभवतीच्या जगाचे असतात आणि वाचनातून, ऐकण्यातून, पाहण्यातूनही ते होत असतात. हा चांगुलपणा व्यक्तिगत आयुष्य तर उजळवतोच पण समाजात चांगुलपणाची रुजवण होत राहिली तर समाजातली सकारात्मकताही वाढते.
खरं तर आपल्या प्रत्येकाच्या आत असतोच हा चांगुलपणा. त्याचं संगोपन संस्कारातून होतं, भोवतीच्या परिस्थितीतून होतं. फक्त आपल्या मनाची भूमी हे संस्कार घेण्यासाठी उत्सुक असायला हवी. भारतीय संतांची परंपरा तर आपल्या अभंगांमधून, दोह्यांमधून आणि इतरही लेखनामधून चांगुलपणाची अखंड रुजवण करत आली आहे. आजही आपल्या अवतीभवती चांगुलपणाचे कितीतरी आदर्श दिसतात. आयुष्याला अर्थ मिळतो तो केवळ संपत्तीमुळे, कीर्तीमुळे किंवा मानसन्मानांमुळे नव्हे, आपल्यातलं माणूसपण जगण्याला खरा अर्थ देतं. चांगुलपणाची साखळी तयार करण्यासाठी हे माणूसपण मदत करतं.
माणूस, समाज आणि राष्ट्र घडवणाऱ्या या चांगुलपणाविषयी ऐकूया ज्येष्ठ लेखिका- कवयित्री अरुणा ढेरे यांच्याकडून.
त्यासाठी जॉईन व्हा – www.lifeceo.in ला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

X